19 July 2015

गोरखगड-सिद्धगड

           
          गोरखगड आणि सिद्धगड.. बरेच दिवस मनात घोळत असलेला ट्रेक. बरेच दिवस अश्यासाठी की या गडांची चढाई ही सह्याद्रीचा पश्चिम घाटमाथा उतरून कोंकणातून सुरुवात करावी लागते. अगदीच तळ कोंकणातून नसले तरी कोंकणात जितकी दमट हवा तितकीच इथेही. मी स्वतः कोंकणातला असल्याने घाट माथ्याखालून चढाई म्हंटली की माझ्या कपाळी घाम येऊ लागतो. त्यामुळे 'बघू थंडीच्या मौसमात जाऊ' किंवा 'भर पावसात करू म्हणजे घाम कमी येईल' असल्या कारणांनी चालढकल करत हा ट्रेक राहून गेलेला. पण हल्ली थंडीही पूर्वीसारखी (गुलाबी?) पडत नाही आणि पाऊसही जेमतेमच बरसत असल्याने यावेळी जास्त आढेवेढे न घेता एका वीकेंडला गाठोडी उचलली आणि नेहमीप्रमाणे रात्री बाराच्या ठोक्याला घराबाहेर पडलो. सांगायला दिवस पावसाळी पण पुण्यात पावसाचा पत्ता नव्हता. मी, सुबोध, सुजय, अलोक आणि प्रणव असे गडी गोळा करत करत गाडी हायवेला लावली. आम्ही पाच आणि आमच्या पाच ब्यागा त्यामुळे वाढल्या वजनानी दबलेली माझी गाडी जरा कुंथतच चालत होती. त्यातच लोणावळा जवळ येताच माझ्या नाकाला बुर्जीच्या सुवासाची आठवण येऊन पोटातून अचानक 'एक हाफ फ्राय आणि डबल अंडा बुर्जी वीथ दोन पाव एक्स्ट्रा' अश्या आरोळ्या येऊ लागल्या. ह्या हाकेला ओ देत रात्री दोनच्या सुमारास सर्वप्रथम गाडीची भूक भागवून मग आमची गाडी खंडाळा एक्झिटच्या आधी एका टपरी बाहेर उभी केली. लोणावळ्यात मस्त पाउस होता. बुर्जी, म्यागी (सनफिस्टची, नेस्लेची नाही) आणि चहा अशी कडक मेजवानी झोडून पुन्हा गाडीनी हायवे धरला. पुढे जाऊन कर्जत-खोपोली रोडला उजवी घेतली तोपर्यंत पहाटेचे साडेतीन-चार वाजले होते. पावसाचे दिवस, त्यात महाराष्ट्र, त्यात रायगड जिल्ह्यातले गावाकडचे रस्ते त्यामुळे पूर्वीच्या अनुभवाने मुरबाड तालुक्यातले देहरी गाव गाठायला अजून तीन तास तरी नक्कीच लागतील या माझ्या अंदाजाला रायगड जिल्ह्याच्या पीडब्ल्यूडीनी काळे डांबर फासले. खोपोली-कर्जतहून नेरळ मार्गे देहरी गाठेपर्यंत रस्त्यात एकही खड्डा ‘न’ लागल्याने मी खडबडून जागा राहून गाडी चालवत होतो. हा चमत्कार कसा काय घडला असल्या विचारातून बाहेर पडेपर्यंत पुढच्या दीड-दोन तासात आम्ही गोरखगडाच्या पायथ्याला दाखल झालो. गावांना जोडणारा इतका सुंदर रस्ता मी फक्त गोव्यात फिरताना पहिला होता. वेळेआधीच पायथा गाठल्याने अजून उजाडायला बराच वेळ होता. त्यामुळे तिथेच रस्त्याशेजारील एका दुकानाबाहेर आम्ही आमच्या पथारी अंथरल्या आणि सकाळपर्यंत आडवे झालो. त्या दुकानाचा मालक हमीद पटेल याने शटर उचलल्यावर आम्हाला जाग आली. पटेलसाहेबांचे दुकान म्हणजे उत्तम युटीलिटी आहे. पेट्रोल पासून पोह्यांपर्यंत सर्व वस्तू दुकानात उपलब्ध आहेत. त्यातले फक्त आम्ही पोहे मागवून न्याहारी उरकली आणि गोरखगडाच्या वाटेला लागलो.        
Stripted Tiger
   देहरी गावातूनच गोरख आणि मच्छिंद्र गडाचे सुळके नजरेत भरतात. रस्त्यालगतच्याच विठ्ठल मंदिराशेजारून गडावर वाट जाते. वाटेवर पाऊल ठेवताच जंगलाचा फील येऊ लागतो. इथे तुमचे स्वागत करायला नाना रंगी फुलपाखरे येतात. लेमन पॅन्सी, ब्लु मोरोन, जेझेबेल, स्ट्रीप्टेड टायगर, कॉमन लेपर्ड अश्या निरनिराळ्या फुलपाखरांची फौज आपल्यासमोर फिरत असते. डोळ्यासमोर गोरखगडाचा सुळका ठेऊन चालू लागले की सुमारे
Common leopard
तासाभरात आपण सुळक्याच्या तळाशी असलेल्या महादेवाच्या भग्न मंदिरापर्यंत येउन पोहोचतो.  पुढे अजून पन्नास मीटर चढाई करून आम्ही कातळात खोदलेल्या दरवाज्यात येउन पोहोचलो. पाऊस मधूनच हुलकावणी देत होता. त्यामुळे कॅमेरा लपवण्यासाठी आमची धांदल होत होती.दरवाजाच्या आडोशालाच आमच्या ब्याग्स ठेऊन आम्ही गडाच्या पूर्वेला खोदलेल्या गुहेत येउन पोचलो. पंचवीस-तीस जण सहज मावतील एवढी मोठी गुहा गोरखगडाचे प्रमुख आकर्षण आहे. गुहेबाहेरच तीन पाण्याची टाकं आहेत. समोरच उभा असलेला मच्छिंद्रगडाचा सुळका स्वतःची ओळख करून देत होता. टाकातले पाणी भरून घेऊन आम्ही गडाच्या माथ्यावर चढाई करू लागलो. सुळक्यावर जाण्यासाठी डाव्या बाजूच्या कातळात अत्यंत सुरेख आणि तितक्याच अवघड अश्या सुमारे पन्नास पायऱ्या खोदलेल्या आहेत. प्रचंड वारा आणि अवघड काताळातील पायऱ्या यामुळे जरा कसरत करतच माथा गाठावा लागला.
        साधारण २१३० फुट उंची असलेल्या गोरखगडाच्या माथ्याचा विस्तार बराच मर्यादित आहे. इथले सुस्थितीतले छोटेखानी महादेव मंदिर पाहून जरा बरे वाटले. माथ्यावरून नजर उंचावल्यावर आहुपे घाटापासून ते नाणेघाटापर्यंतचा परिसर दिसत होता. पाठीमागे धमधामिचा डोंगर आणि सिद्धगड नजरेत मावत नव्हते. या परिसरात पाऊस झाल्याने चहुबाजूला हिरवा रंग ओसंडला होता. इतका रमणीय परिसर पाहून आपला थकवा नाहीसा होतो. मन शांत होते. गोरक्षनाथांनी साधनेसाठी याच डोंगराची निवड का केली असावी याचे उत्तर बालेकिल्यावर उभे राहिल्यावरच उमजते. आमच्यातल्या प्रत्येकाने गडाबरोबर, अहुपेघाटासोबत सेल्फी काढून घेतला नसता तरच नवल! महादेवाला दंडवत घालून आम्ही बालेकिल्ला उतरायला लागलो. आहुपे आणि गोरखगडाच्या बेचक्यातच गोरक्षनाथांचा रमणीय आश्रम आहे. इथूनच पुढे सिद्धगडाकडे नेणारा जुनी पायवाट तुडवून पुढील तीन चार तासात सिध्दगड गाठावा या हिशोबानी आम्ही आश्रमापर्यंत येउन पोहोचलो पण ‘पुढच्या दऱ्यांमध्ये दरड कोसळल्याने वाट सापडणार नाही’ अशी माहिती त्या आश्रमातल्या एका साधूने दिली. त्यामुळे नाईलाजास्तव ती दरड पाहून आम्ही पुन्हा पायथ्याकडे जाण्यासाठी निघालो.Ahupe Ghat
       सततच्या पावसाच्या हुलकावणीमुळे हवा दमट झाली होती. दुपारी दोनला देहरी गाठेपर्यंत घामानी भिजलो होतो. सुबोधला लिंबू सरबताची, प्रणवला माझाची तर सुजयला स्प्राईटची तहान लागली होती. हमीदभाईनी गरजेनुसार सगळ्यांचा तहान भागवल्या. दुपारचा डबा तिथेच खाऊन आम्ही सिद्धगडकडे रवाना होण्यासाठी सज्ज झालो पण हवेतील उष्म्यामुळे कोणाच्याही अंगात त्राण राहिले नव्हते. त्यातच नारिवली गावातून सिद्धगड माची गाठायला तीन चार तास लागतात असा अंदाज होता. पण वाटेत भेटलेल्या गावातील एका आजोबांनी नारिवली गावातून जाण्यापेक्षा जांभूर्डे गावातून गेलात तर सिद्धगड तासाभरात गाठाल असा सल्ला दिला आणि आम्हा सगळ्यांच्या जीवात जीव आला. त्यानुसार जांभूर्डे फाट्यावरून डावी घेतली आणि पुढे जाऊन 'भीमाशंकर संरक्षित वनक्षेत्र' या पाटीखाली फॉंरेस्ट चेकपोस्टला गाडीचे आणि माणसांचे शुल्क भरून अत्यंत कच्च्या रस्त्यांनी गाडी सिद्धगडाच्या दिशेला लावली. ट्रेकच्या कॉन्ट्रीमध्ये वाढ झालेली लक्षात येताच आम्ही त्या चेकपोस्टवाल्याला मनातच शिव्या वहिल्या. 
        इथून पुढे साधारण पाचसहा किलोमीटर कच्च्या रस्त्यानी गाडी हाकल्यावर स्वातंत्र्य सेनानी भाई कोतवाल यांचे समाधी स्थळ लागते. त्रेचाळीस साली या जागी ब्रिटिशांबरोबर झालेल्या चकमकीत भाई कोतवाल आणि हिरोजी पाटील हे दोन क्रांतिकारी मृत्युमुखी पडले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाधी स्थळ उभारण्यात आले. इथे पोहोचल्यानंतर मात्र आम्हा सर्वांची टाळकी सटकली. एका मोठ्या धबधब्या समोर ही समाधी एकाकी उभी होती. धबधबा असल्याने थोडीफार पर्यटकांची गर्दी असणारच. समाधीवर आणि समाधीजवळ दारूच्या बाटल्या, प्लास्टिक यांचा खच पडला होता. प्रणवनी पटकन जाऊन समाधीवर पर्यटकांनी काढलेले कपडे, बूट उचलून खाली ठेवले. झऱ्याखाली मोठ्या आवाजात, बेधुंद अवस्थेत काही तरुण कोतवालांच्या समाधीसमोर जणु काही त्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता म्हणून बीभत्स अवस्थेत नाचत होते. तिथल्याच फुटलेल्या बाटल्या घेऊन त्यांची डोकी फोडावीत असा विचार मनात येत होता. महाराजांच्या महाराष्ट्राला रक्तरंजित बलिदानाचा एवढा इतिहास असूनही इतकी कोडगी आणि बेफिकीर अवलाद आपल्याच देशी का जन्माला येतात? आपण कुठे आहोत याची यत्किंचितही जाणीव त्यांना नव्हती. फॉंरेस्ट चेकपोस्टवर अश्यांना बाटल्या घेऊन जातानासुद्धा कुणी आडवत नाही. कुणी आडवं आलाच तर तत्कालीन मंत्र्याची ओळख दाखवून दादागिरी दाखवायलाही लोक मागेपुढे पहात नाहीत आणि अश्यासारख्या इतर अनेक पर्यटनस्थळी दारूच्या दुकानांचे परमिट देणारेही सरकारी अधिकारीच. देवा धर्माच्या स्थळी पावित्र्य पाळता ना मग अश्या जागी सय्यम पाळायला बरी बुद्धी गहाण पडते. हेच पाहण्यासाठी का इथपर्यंत आलो? असे चेहरे आम्हा सगळ्यांचे झाले होते.काही क्षणातच आम्ही तिथून गाडी वळवली आणि दोन किलोमीटर अलिकडे असलेल्या जेमतेम पंधरा-वीस उंबऱ्याच्या बोरवाडी गावात पार्क केली. एका कमरेतून वाकलेल्या वाडीतल्या आजोबांनी सिद्धगडाकडे नेणारी पायवाट दाखवून दिली. दुपारचे चार वाजले होते. घनदाट वनक्षेत्राच्या परिसरात सिद्धगडाचा खडा पहाड आपले अस्तित्व दाखवत होता. गडाचा बालेकिल्ला ढगात गुडूप झाला होता. पाउस नव्हता तरी प्रचंड उष्मा अंग भाजून काढत होता.        
   पहिल्या टप्प्यातली खडी चढण चढताना हरीशचंद्राच्या नळीच्या वाटेची आठवण आली. निम्म्या वाटेवरती आमचा पहिला पडाव पडला. सगळे घामानी आणि चिखलानी माखले होते. उकाडा असह्य होत होता. एनर्जी ड्रिंक, गोळ्या, चिक्की यांची देवाणघेवाण सुरु झाली. अधेमधे थंड पाण्याचे झरे आमची तहान भागवत होते. पुढे अवघड असे नसले तरी निसरडे कातळ पार करताना बरीच काळजी घ्यावी लागत होती. गडाच्या माचीवर प्रवेश करण्याआधी शेवटच्या टप्प्यात छोटासा रॉकपॅच ओलांडताना सुजयच्या थकलेल्या पायांनी उगाचच हुलकावणी दिली आणि त्याचा चुकलेला काळजाचा ठोका पुढे उभे असलेल्या आम्हाला ऐकू आला. आता त्याचे पाय लटपटू लागले होते. अलोकनी त्याची ब्याग ओढून घेऊन मग त्याला वर ओढला. त्याचा चेहरा बघुन इकडे आम्हाला उगाच घाम फुटला होता. शेवटचा दगड ओलांडला आणि पुढे एका आंब्याखालून बालेकिल्ला उजवीकडे ठेऊन डावीकडची पायवाट धरली आणि इथपासून थेट सुमारे दोन किलोमीटरवर सिद्धगडवाडी गावाकडे पायपीट चालू केली. अंधार पडायला अजून तासभर अवकाश होता. पण गावाकडे आणि गावाकडून मंदिराकडे नेणारी वाट आंब्यांच्या गर्द झाडीतून पुढे सरकत होती. पायवाटेवर आंब्यांच्या ओल्या काळ्या पानांचा खच पडला होता त्यातच पाऊस झाल्याने चिखल साचला होता. रस्त्याच्या एका बाजूला शेतांमध्ये भात लावला होता. काही गावकरी शेवटची लावणी संपवून बैलजोडी घेऊन गावाकडे परतत होते. सिद्धगडवाडीच्या वेशीवर एका दगडी विहिरीवर आम्ही पाणी भरून घेतले.वस्तीसाठी बाले किल्ल्याच्या पोटातल्या बाबाच्या गुहेतच जाणार होतो पण अंधारू लागल्याने गावातील शाळेत डेरा टाकावा असा विचार करून गावाची वेस ओलांडली. जेमतेम वीस पंचवीस उंबरठे पण इथे शाळा आहे हे ऐकून कौतुक वाटले पण चौकशी केल्यावर ती बंदच असते असं कळले. 'एवढा पाऊस पाण्याचा डोंगुर चढून कुणी मास्तुर वर येत नाही' अशी माहिती मिळाली. एका पाडयावरील दोन गावकऱ्याजवळ शाळेची चौकशी केल्यावर त्यांनी 'गावाच्या खालच्या अंगाला अजून धा मिन्टावर मंदिरात जावा' अशी ऑर्डर सोडली. बहुदा पूर्वी कधीतरी आलेल्या टवाळ ट्रेकर्सनी शाळेत राहुन काहीतरी गोंधळ घालून त्रास दिलेला असावा असं त्यांच्या एकंदरीत आविर्भावावरून वाटत होते. 
      मंदिराकडे नेणारी वाट गर्द आमराईतून निघून सिद्धगडाच्या उत्तर दरवाज्याजवळ येऊन संपते. सूर्यास्त होऊन गेल्याने या वाटेवरती जास्तच अंधार दाटला होता. रस्त्याच्या टोकाला एके ठिकाणी पत्र्याची शेड नजरेस आली आणि तंगडतोड करून मोडकळीस आलेले पाय घेऊन मंदिराच्या ओटीवर पोहोचलो. ब्याग्स उतरवल्या आणि कपडे बदलून घेतले. स्टोव्ह मांडला आणि आधी चहाचं आधण ठेवलं. तोपर्यंत आम्ही सगळेजण स्थिरस्थावर झालो होतो. कुंद वातावरणात चहाचे झुरके घेत स्वागत करणाऱ्या निसर्गाशी ओळख करून घेत होतो. टिपीकल तळकोंकणातली जशी मंदिर असतात तशाच काहीश्या रचनेच सारवलेलं आयताकृती मंदिर पाहून सुखावलो. मंदिरातला देव मध्यभागी भल्यामोठ्या दगडाला शेंदूर फासून लाकडी महिरपीत बसवला होता. मंदिराच्या पायऱ्या जांभ्याच्या होत्या. चहुबाजूनी छानशी पडवी होती. मंदिराच्या मागे शंकराची भग्न पिंडी आणि नंदी होता. सातवाहन काळातील काही शिल्पकृती माळावर विखुरल्या होत्या. एक छोटीशी जम्बुरका तोफ दगडांवर बसवली होती.समोर अजस्त्र धमधमीचा पहाड ध्यानस्थ बसला होता. पाठीमागे गडाचा बालेकिल्ला धुक्यात गुडूप झाला होता. त्याच्या पायथ्याशी असलेल्या बेहड्याच्या जंगलात वानरांची हालचाल दिसत होती. भोवताली किर्र झाडी होती. रामरक्षास्तोत्र म्हणत असल्यासारखी संथ लयीतली रातकिड्यांची चाललेली किरकिर, मधुनच घंटानाद घुमावा तसे घुमणारे वानरांचे हुंकार यामुळे अत्यंत गूढ वातावरण तयार झाले होते. मधेच येणारी एखादी पावसाची सर सारी सृष्टी हालवून सोडत होती. सूर्य अस्तास गेल्याने पाखरांची परतीची लगबग कळत होती. सादेला प्रतिसाद देणारे नाना पक्ष्यांचे आवाज एकाचवेळी त्या परिसरामधून उमटत होते. पश्चिम घाटातला सगळ्यात आघाडीचा गायक म्हणजे 'मलबार व्हिसलिंग थ्रश' म्हणजेच कस्तूर. सूर्यास्तानंतर आपल्या विशिष्ट ढंगाच्या गायकीतून जणू काही 'यमन' साकारत असल्याचा भास होत होता. कुठलाही परतावा न मागता समर्पित भाव जागवणारा यमन जसे समोरच्याला आकर्षित करून घेतो तसाच स्वत्व विसरवून कितीतरी वेळ हा कस्तूर फक्त आमच्यासाठीच गात होता असं वाटत होतं. त्याच्या तोडीला दयाळ पक्ष्याची जोडी करवंदीच्या झुडुपावर बसून ताना देत होती. दोघांची घराणी सारखीच असली तरी गाण्याची ऐट निराळीच होती. एका झुडूपातली रातकिड्यांची किरकिर थांबली की लगेच दुसऱ्या झुडपातून रातकिड्यांचा आलाप सुरु व्हायचा. ही जुगलबंदी बराच काळ रंगली होती. संपूर्ण अंधारून आल्यावर सुरांचा दरबार बरखास्त झाला आणि आम्ही रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागलो. स्टोव्हवर आमचे आवडते ट्रेकान्न म्हणजेच खिचडी शिजत होती. आम्ही सारे स्टोव्ह भोवती कोंडाळ करून बसलो होतो. इतिहास, राजकारण, संगीत अश्या गप्पांना उधाण आले होते. प्रथेप्रमाणेच आमच्या डोक्यात भावी मोहिमांचे प्लानही शिजत होते. रात्रभर ड्रायव्हिंग आणि त्यात दिवसात दोन गड सर झाल्याने डोळ्यांवर झोप दाटली होती. भात शिजयचाच अवकाश की तो आम्ही मटकावून लगेच आडवे होणार होतो. पक्ष्यांची जुगलबंदी कमी होती म्हणून की काय सुजय आणि सुबोध यांनी रात्रभर एकमेकांशी घोरण्याची स्पर्धा लावली होती.          
 
Malbar Thrush (Courtsey:Google)
पहाटे पुन्हा एकदा कस्तुराच्या गाण्यांनी जाग आली. हा म्हणजे पूर्वी राजघराण्यांमध्ये पहाटेच्या समयी भाट आळवायचे तशी भूमिका इथे बजावत होता. सकाळी सहाच्या सुमारास समोरच्या दरीमध्ये नीळा प्रकाश फाकला होता. पाऊस पाण्याबरोबर वाळकी पाने मातीत मिसळून एक वेगळाच सुगंध सगळ्या जंगलात पसरला होता. माझी चाहूल लागताच मंदिरा मागच्या उंबरा वरून एक शेकरु टुणकन उडी मारून
Crested Serpent Eagle (Courtsey:Google)
झाडीत पसार झाले. सूर्य वरती सरकू लागला तसा समोरचा माळ प्रकाशात उजळून निघाला. एक 'क्रेस्टेड इगल' चीत्कार करत दरीवर घिरट्या घालत होते. तेवढ्यात आमच्या चाणाक्ष नजरेला माळावर झुडूपात काहीतरी हालचाल दिसली. झुपकेदार लांब शेपटीचे मार्जार कुळातील एक इंडिअन सीवेट वाळवी खाण्यासाठी धडपडत होते. थोड्या वेळानी आभाळात फिरणारे गरुडराज तिथे अवतरले. आपले दीड फुटी पंख पसरवून आणि पिवळ्या तीक्ष्ण चोचिनी हुलकावणी देऊन त्या रानमांजराला तिथून हुसकावू लावले. आमच्या कॅमेऱ्यांनी चाळीस पट नजर ताणून आम्हाला या प्रसंगाचे दर्शन घडवले. हा सगळा नजारा पाहण्यात आमची अख्खी सकाळ खर्ची पडली. इतकी सुंदर जागा सोडून कुठेही जाण्याची इच्छा झाली नाही. तसाही बालेकिल्ला अजूनही ढगांमाधेच डोकं घालून होता त्यामुळे वरती जाऊनही धुक्यात काही दिसणार नाही असे अनुमान काढून आता चहा मारून सरळ परतीच्या प्रवासाला निघायचे असे सर्वानुमते ठरले. आमचा गाषा गुंडाळून निघेपर्यंत साडेअकरा वाजले होते. हलक्या पावसाच्या सरी पायवाटा धुवून काढत होत्या. गर्द झाडीतून सड्यावर येईपर्यंत प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाचे दर्शन नव्हते. त्यामुळे एकदम काळोख्या गुहेतून बाहेर आल्यासारखे वाटत होते. तत्काळ ढगांचे पांघरूण उलथवून वाऱ्याचा एक स्त्रोत दरीत उडी घेऊन पुन्हा उसळी घेयचा. गड उतरायला लागल्यावर एक जाणीव प्रकर्षाने होऊ लागली. आम्ही जंगलातल्या त्या गूढ जगाचा निरोप घेऊन वास्तव जगाला सामोरे जाणार होतो. ना तिथे पाखरांची गीते ऐकू येणार होती ना कड्यावरून कोसळणाऱ्या झऱ्यांचा आवाज गुंजणार होता. जंगलाच्या उग्रगंधीत तरीही अद्वितीय सुवासाने संमोहित झालेल्या मनाला वास्तव जगताशी फारकत घेण्याचा मोह होत होता. पण व्यावहारिकदृष्ट्या या परावलंबी जगाला सोडून राहणे कोणालाच शक्य नव्हते. जगल्या क्षणांना आणि अनुभवलेल्या प्रसंगांना हृदयाशी घट्ट बांधुन आम्ही मनाची समजूत घातली आणि आल्या पाउलवाटी निघून इथल्या निसर्गाचा निरोप घेतला.

24 March 2015

अलंग मदन कुलंग

           गेले दोन तीन महिने माझा पाय पुण्याच्या वेशी बाहेर पडत नव्हता. जर काही प्लान बनवला की काहीतरी कारण निघून पुन्हा तो प्लान गुंडाळून ठेवावा लागत होता. पुत्रप्राप्तीनंतर कसल्या कसल्या जबाबदाऱ्या  अंगावर येऊन आदळत होत्या. त्या समर्थपणे पेलण्याच बळ अंगी उतरावं म्हणून सह्याद्रीला साकडं घालण्याशिवाय पर्याय नाही हे मनाला कळत होते पण वळत नव्हते. आमच्या पोराचे (वय वर्ष ) उधळते गुण बघुन चहुबाजूनी कौतुकांचे फवारे आमच्यावर उडू लागले होते. 'काही झालं तरी तुम्ही तिघेही यायलाच हवं' हे वाक्य शेपटीसारखे प्रत्येक नातेवाइक, मित्र मंडळी यांच्याकडून आलेल्या बाराश्यापासून श्राद्धापर्यंतच्या आणि असंख्य अनौपचारिक आमंत्रणाबरोबर लोबू लागलं. 'साला घर हाफिस अन हाफिस नी घर' असल्या अवस्थेत मी तीन महिने काढले. आता तर उन्हाळा सुरु होईल या काळजीनीच घाम फुटू लागला. शेवटी ठरवलंच. दोन दिवसात कामाची चक्र बदलून टाकली आणि ऑफिसच्या लांबलेल्या कॉल्स मधून, पुण्याच्या असह्य ट्राफिक मधून, नकोश्या झालेल्या आमंत्रणामधून, पोराच्या मुत्र्या चड्ड्या बदलण्यातून वेळ काढलाच आणि एके रात्री भरधाव वेगानी आमची घोडी पुण्याच्या वेशीबाहेर उधळली. लक्ष्य होते नाशिक जिल्ह्यातील कळसुबाई रांगेतील, AMK अर्थात 'अलंग-मदन-कुलंग'.      
        पहाटेच्या गारव्यात आंबेवाडी गाव कुडकुडत होतं. सप्तमीची चंद्रकोर आभाळ धरून होती. सोबतीला असंख्य नक्षत्रांची रांगोळी मांडली होती. वाऱ्याचा जोरही भलताच होता. आम्ही गाडीतून उतरून तिथेच एका घराच्या अंगणात पाठ टेकल्या. मुंबईकरांचा  एक ग्रुप आधीच तिथे पोहोचला होता. तास दीड तास  विश्रांती घेऊन मग ट्रेक सुरु करायचा असा विचार बाजूला सारला गेला कारण पश्चिमेकडून येणाऱ्या काळ्या ढगांनी समोरील अलंग मदन कुलंग सोबत कळसुबाईपर्यन्तचा साऱ्या प्रदेशावर कब्जा केला होता. विजांच्या लखलखाटात सह्याद्रीचा अभेद्य कातळ क्षणात उजळून निघत होते. राकट गडांच्या त्या काळ्या रांगा पापणी लवेस्तव पुन्हा अंधारात लुप्त होत होत्या. मोहिमेवर अवकाळी पावसाचं सावट होतं. माळरान तुडवून अलंगच्या पदरी पोहोचेपर्यंत चिंब भिजलो होतो. AMK ची मोहीम ही सह्याद्रीतली सगळ्यात अवघड मोहीम म्हणून गणली जाते. इथे ट्रेकर्सचा खरा कस लागतो. सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवर खेळणे म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव इथे मिळतो. तसा याआधीही आम्ही हा ट्रेक केलेला होता. पण हा ट्रेकच पुन्हा पुन्हा करण्या सारखा आहे. कातळारोहण(Rock Climbing) कलेत पारंगत असलेला आणि त्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक बाजू जाणणारा ट्रेकरच ही मोहीम यशस्वी करू शकतात. आता पावसानी गडाचे कातळ ओले असले तर चढणार तरी कसे या विचारांनी काही क्षण मन काळवंडले. त्यामुळे वेळ दवडता नाश्ता करून सगळ्या ग्रुपची दोन गटात विभागणी झाली. मुंबैकरांनी आधी अलंग गडावर तर पुणेकरांनी आधी मदन गडावर चढाई करायची असे ठरले. त्यानुसार आम्ही सगळे वेगवेगळ्या दिशांना चालू लागलो. अलंग गडाच्या पदरातून पश्चिमेच्या दिशेला अरुंद वाटेनी चालू लागल्यावर मदन गडाच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसू लागतात. या चढून गेल्यावर आपण थेट ४० फूट उंच कातळ भिंती जवळ येउन पोहोचतो. आणि इथे खऱ्या ट्रेकरचे कसब दिसून येते         पावसाच्या पाण्यानी कातळ बऱ्यापैकी निथळत होते. एकीकडे कातळ तर दुसरीकडे जबडा उघडून पसरलेली खोल दरी हृदयाचे ठोके वाढवत होती. आमचा धाडसी ग्रुप लीडर प्रसादनी अत्यंत मनोभावे रॉक पॅचला पाय लावला. एकेक होल्ड पकडत वर जाण्याच्या प्रयत्नात असताना ओल्या कातळामुळे पाय घसरत होत. शेवटी शूज काढून पुन्हा प्रयत्न सुरु झाले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनी एकदाचा कातळाला रोप लागला. त्याच्या नंतर खर तर मीच चढाईला हात घालणार होतो पण तेवढ्यात प्रसादनी वरतून ओरडून निरोप पाठवला कि सगळ्यात हलका कोणी असेल त्याला आधी पाठवा. माझं वजन वाढलय याची मला चांगलीच खात्री पटली. मग आमच्यातलाच एका हलक्या मनुष्याला (वजनाने..दर्जाने नव्हे) म्हणजे ओमकारला दोर पकडायला लावला आणि तो वर चढता झाला. रोप मजबूत आहे याची खात्री पटल्यावर मग मी चढून गेलो आणि त्यानंतर बाकी सगळ्यांना वरती खेचण्यात आले. या कामी मी प्रसादची मदत करत होतो. कुठे पाय ठेव, कुठला होल्ड पकड वगैरे लाइव सूचना देण्याचे काम सुरु होते. आता पाउस पूर्ण उघडला होता आणि राज्य सूर्यदेवाचे होते. दुपारचे बारा वाजत आले होते. मदनच मुख्य कातळकडा चढून गेल्यानंतर आपण पुन्हा एकदा दगडी पायऱ्यांजवळ पोहोचलो आणि मदन गडाचे मदन चिकणे रूप डोळ्यात भरू लागले. शिवाय माथ्यावरून दिसणारे संपूर्ण सह्याद्रीच्या मानांकित कळसुबाई रांगेचे सौंदर्य केवळ अप्रतिम! पूर्वेला ४८२२ फुट उंचीचा अलंग गड एखाद्या वेटोळे घातलेल्या सुस्त अजगरासारखा भासत होता. तर त्यापलीकडे कळसुबाई शिखर आभाळाला भिडले होते. आणखी नजर उंचावल्यावर काहीसे धुसर रामसेज, हरिहर, ब्रम्हगिरी, त्रिंगलववाडी यांची पंगत बसलेली दिसत होती. तर पश्चिमेला कुलंग गड पाठ राखून उभा होता. इकडे नैऋत्येला सांधण दरीशी खेटून रतनगड, कात्राबाई, आजोबा हे कुटुंब ऊन शेकत होते. इथे येण्यासाठी लागलेले कष्ट क्षणार्धात सह्याद्रीच्या सौंदर्यावर ओवाळून टाकले. मन शांत झाले. काही काळ तिथेच बसून ताजी शुद्ध हवा फुफ्फुसांमध्ये भरून घेतली आणि छत्रपतींच्या जयघोषात गड उतरू लागलो. पुन्हा रॉकपॅच पर्यंत पोहोचेस्तव फुफ्फुसातली हवा पोटापर्यंत पोहोचली होती. सगळ्यांना सपाटून भुका लागलेल्या. ज्यांनी रॅपलींग केलय त्यांनी आधी जा असा आदेश आला, मी दोर धरून खाली गेलो. अजून काही जणांची वाट पाहून पुन्हा गुहेच्या दिशेनी चालू लागलो. परतीच्या मार्गावर मुंबईकरांचा ग्रुप अलंग चढाई संपवून मदनच्या मार्गाला लागलेला दिसला तेही दुपारचे भोजन उरकून. याचा अर्थ पुणेकरांनी मदनाचे सौदर्य न्याहाळण्यात बराच वेळ घालवला होता. दुपारचे तीन वाजले होते. यापुढे जेवण उरकून अलंगवर चढाई करायला चार तरी वाजणार शिवाय सूर्यास्तापूर्वी गुहेत परतणे गरजेचे होते. ग्रुपच्या महिला वर्गानी तोपर्यंत स्वयंपाकाची जबाबदारी पार पाडली होती. मी, ओमकार, प्रणव,सुबोध आणि प्रशांत गुहेत येऊन पोहोचलो. मागून येणारे अजून बरेच होते त्यामुळे जरा दबकत दबकतच व्हेज कोल्हापुरी आणि पोळीवर ताव मारला. जरा वामकुक्षी घेयचा विचार होता पण वेळे अभावी लगेच अलंगला रोप्स लावण्यात आले.

    या पुढील लक्ष होतं छातीचा कोट करून उभा असलेला अलंग आणि त्यासाठी पार करावा लागणारा सुमारे साठ फूट उंचीचा उभा कातळकडा. आंबेवाडीतच राहणाऱ्या कैलास नावाच्या एका अस्सल राकट मावळ्यानी अगोदरच चढून जाउन वरच्या गुहेतून एक रोप खाली सोडला होता. ही लोक इतकी चपळ आणि काटक असतात की पायात साध्या पावसाळी चपला घालून झरझर वानारासारखी चढून जातात आणि तेही दोरीशिवाय. महाराजांनी स्वराज्य उभारणीला असलेच मावळे का निवडले त्याचं मुख्य कारण इथे उमजु लागतं. कैलास ज्या परिस्थितीत चढून गेला ते पाहून माझी मलाच लाज वाटू लागली. इकडची तर बरीचशी मंडळी भारीतले ट्रेक शूज आणि कसली कसली आयुध घेऊन सज्ज होती. या जाणीवेनी मी आयत्या सोडलेल्या रोपला तरी स्पर्श करणार नाही असं मनाशी ठरवून टाकलं आणि तानाजी मालुसरे, कोंडाजी फर्जंद, फिरंगोजी नरसाळा वगैरे मंडळीना मनोमन दंडवत घालून कपारीत हात घातला.कैलासला आधीच बजावले की 'मला प्रयत्न करू दे, तू वर खेचू नकोस'. केवळ सेफ्टी रोप कमरेत अडकवला होता. एकेक होल्ड पकडून कधी हाताच्या जोरावर तर कधी पायाच्या जोरावर वर चढून गेलो. काही अवघड जागी तर हात सटकत होते.संपूर्ण शरीर कातळाला बिलगून ठेवावे लागत होते. चुकून खाली नजर गेली तर शंभर फूट खोल दरी माझाकडे बघून हसून जिभल्या चाटत असल्याचा भास होत होता. पण मार्ग दाखवणारा साक्षात सह्याद्री असल्यामुळे अत्यंत आत्मविश्वासानी मी कातळाला बिलगलो आणि काही क्षणात चढून गेलो. आनंदी आनंद !! अंगातली रग बाहेर पडल्यावर होणारा आनंद आणि मिळणारं समाधान काही औरच. इथून पुढे पुन्हा रेखीव कातळात खोदलेल्या पायऱ्या लागल्या. एकेक पायरी अर्धा पाऊन फूट उंच. चढताना जी काही धाप लागते की आता हृदय छाताडातून बाहेर डोकावतंय कि काय असा भास होतो.

     अलंग गडाचा परिसर बराच मोठा आहे. अलंगचा दक्षिण कडा चढून गेलो कि समोर एक संपूर्ण भग्न अवस्थेतल शिवाचे मंदिर सामोरे येते. तिथूनच काही अंतरावर पडक्या वाड्याचे अवशेष आहेत. थोडं वरच्या दिशेला चढून गेलं  कि दोन तीन गुहा लागतात. पंचवीस लोक सहज मावतील इतकी मोठी गुहा आहे. गुहेचाच वरचा भाग अलंगचे पठार म्हणून ओळखला जातो. इथे पुन्हा काही वाड्याचे अवशेष, सात पाण्याची टाकी आणि छोटास मंदिर आहे. बाकी गड नावापुरताच तुरळक तटबंदीचे अवशेष दिसतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अलंग मदन आणि कुलंग या तीनही गडांबद्दल इतिहासात फारश्या नोंदी नाहीत. त्यामुळे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांची अवस्था फारशी बरी  नसताना या उपेक्षित गडाच्या वाटेला काय येणार? त्यामुळे असे गड पाहिले कि मन उदास होते. तहानेनी व्याकूळ असल्याने आम्ही आधी पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या शिवाय जिथे रहाणार होतो तिथे पाण्याची सोय नसल्याने धुण्याची नाही तर नाही किमान पिण्याची तरी सोय व्हावी म्हणून आमच्याकडच्या सगळ्या बाटल्या भरून घेतल्या. संध्याकाळचे पाच वाजत आले होते. सूर्याने केव्हाच आपले तोंड पश्चिमेकडे वळवले होते. आता सूर्यास्त पाहूनच विकीर करावं असा विचार आला पण त्याआधी पुन्हा रॉकपॅच उतरून मदनच्या पोटातल्या गुहेत मुक्कामाला जायचं होतं. त्यामुळे थोडीशी विश्रांती घेऊन उतरणीला लागलो. आजचा मुक्काम उत्तरेला मदनच्या पोटात असणाऱ्या एका वन रूम किचन गुहेत होता. तिथे पोहोचल्यानंतर ब्यागा टाकून पथारी हंथरेपर्यंत पुन्हा एकदा ग्रुपच्या सुगरणींनी गरम गरम टोमाटो सूप हाती दिले आणि व्हेज बिर्याणीच्या तयारीला लागल्या.
        पृथ्वीची आजची गिरकी संपत आली होती. उत्तरेच्या दरीत पिवळा संधिप्रकाश सांडला होता. सूर्य सह्याद्रीचा निरोप घेऊ लागला. तसे कातळ अधिकच रौद्र आणि गडद भासू लागले. थोडा वेळानी अष्टमीची चंद्रकोर लाजत अलंगच्या मागून उगवली आणि काही क्षणात असंख्य तारका नक्षत्रांनी आकाश आणि दरी व्यापून टाकली. प्रथेप्रमाणे आम्हीही गाण्यांमध्ये आणि जुन्या ट्रेकच्या आठवणींमध्ये हरवून गेलो. पेटपूजा आटपल्यावर सगळेजण आपापल्या स्लीपिंग बग्स मध्ये शिरले आणि तोर्चेस मालवताच सगळे आवाज बंद झाले. मधूनच घोंगावणारा वारा आपलेही अस्तित्व दाखवत दरीत उतरत होता समोरची दरी चांदण्यासोबत आता शांततेने भरून गेली. राकट सह्याद्रिनी सर्वांना मायेने अलगत कुशीत घेतले होते.अशी रात्रशोभा पाहत कधी डोळा लागला कळलेच नाही.    
   भल्या सकाळी चंडोल पक्ष्याच्या आवाजाने जाग आली. साऱ्या दरीतच तो आवाज घुमत होताअजून संपूर्ण उजाडलंही नव्हते. स्लीपिंग ब्यागची चेन खाली करून गुहेतून बाहेर नजर टाकली. दरीवर उगवतीचा धुसर निळा प्रकाश फाकला होता. अरुंद गुहेच्या तोंडातून तर हे दृश्य पूर्वी सिनेमास्कोप फ्रेम्स असायचा तसं दिसत होतं. पाण्याच्या कमतरतेमुळे तोंड वगैरे धुण्याचा किंवा निसर्गाच्या हाकेला देण्याचा प्रश्नच नव्हता. इतके ट्रेक्स करून एवढी सय्यमसिद्धी आता अवगत झाली आहेआवरून होईपर्यंत गरम गरम म्यागी आणि चहा आमची वाट पहात होता. पुन्हा एकदा महाराजांच्या जयजयकार करून गुहेतून निघालो आणि उजवी घेत कुलंग गडाकडे नेणाऱ्या सोंडेकडे निघालोमदनच्या पश्चिम बाजूनी दिसणारा अजस्त्र कुलंगचा पसारा डोळ्यात मावत नव्हता. मदन आणि कुलंगला जोडणारऱ्या छोट्याश्या अरुंद नाळेवरून आम्ही कुलंगची पदरवाट धरून चालू लागलो. कुलंगचे उभे कातळ डावीकडे ठेवत आमचा प्रवास सुरु होता. उजवीकडे कारवी आणि काही रानटी काटेरी झुडपे माझे पाय फाडू लागली. हाफ पँट घातल्याचे परिणाम! पण फुल पँट घातली की ढांग फाकवून कातळ कडे चढणे अवघड जाते म्हणून अश्या ट्रेक्सना हाफ पँट बरी पडते. एक लांब वळसा मारून आम्ही कुलंगच्या वायव्य धारेवर आलो. इथून एक रस्ता पायथ्याला भगतवाडी गावाकडे उतरतो. आम्हीही परतताना याच धारेनी पायथ्यापर्यंत उतरणार असल्याने आम्हाला आमची बोचकी इथेच झुडूपात उतरावा आणि आंघोळीचे कपडे आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन कुलंग चढायला सुरुवात करा असा आदेश आला. कुलंग गडावर सगळ्यात आकर्षक काय असेल तर इथली पाण्याची टाके. बाराही महीने इथे पाण्याचा तुटवडा भासत नाही. आपल्या पूर्वजांनी स्वत:ची आणि भावी ट्रेकर्सची तहान भागवण्याची सोय अगदी चोख केलेली आहे. पोहणे म्हंटल्यावर मी चटकन खांद्यावर टॉवेल  अडकवून कुलंगच्या पायऱ्या झरझर चढू लागलो. आधीच पाण्यावाचून घश्याला कोरड पडलेली त्यात कुलंगच्या फुटभर पायऱ्या प्राणही कोरड्या कंठाशी आणून सोडत होता. कुलंग गडाची चढाई ही सह्याद्रीतील सर्वाधिक उंचीची खडी चढण समजली जाते. बाटल्यांमधले उरले सुरले पाणी केव्हाच घशाखाली उतरवले होते. निम्मे लोक पाण्यावाचून आता कासावीस होऊ लागले. पण कुलंग वरील मुबलक पाणी साठा हुडकण्याच्या इर्षेनी प्रत्येक जण घाम गाळीत चढत होता. तेवढ्यात मंगळावर पाणी सापडावे तसे एका दगडी पायरीच्या खोबणीत गोलाकार दगडी वाटीत पाणी दिसले. मी आणि सुबोध त्यावर तुटून पडलो. कुलंगच्या माथ्यावरून दगडी कातळाच्या अंतर्गत प्रवाहातून ते इथे साचत असावे गवताच्या पात्यांवर तरंगणारे पाणी खरोखर वाळ्याचा सुगंध घेऊन प्रकटले होते. दुष्काळी परिस्थिती पाण्यावाचून काय हालत होत असेल याची किंमत अश्या वेळी समजून येते
    

     तहान शमली आणि पायऱ्या चढून आलेल्या पायातल्या गोळ्यांबरोबर कुलंग च्या दरवाज्यातून हर हर महादेवाच्या गर्जनेत गडप्रवेश केला. प्रशांत, प्रणव आणि ओमकार यांनी आधीच गडप्रवेश केला होता आणि ते जल क्रीडेसाठी टाकांभोवती घिरट्या घालत होते. कुलंगचा चौफेर विस्तार डोळ्यात भरू लागला. आकाशात दोन चार गिधाडे घिरट्या घालीत होती. नष्ट होऊ लागलेली ह्या जमातीला सह्याद्रीच्या कातळानी सुरक्षित आश्रय मिळालायअलीकडचे अलंग आणि मदन कुलंग समोर खुजे वाटू लागले. गडावर वीस पंचवीस लोक मावतील एवढी मोठी गुहा आहेसुमारे पंधरा वीस पाण्याची टाकी आहेत. बहुतेक टाकं दोन तीन पुरुष खोल आहेत. आता भुका लागल्या होत्या पण जेवणाची सोय पुन्हा आंबेवाडीतच असल्याने परतीचा प्रवासाला निघणे भाग होतेआम्ही नाइलजानी पुन्हा आल्या मार्गी चालू लागलो. पायऱ्या उतरून ब्याग्स जिथल्या झुडपात सोडलेल्या तिथपर्यंत पोचलो. इथून एक रस्ता कुलंग वाडीला तर दुसरा भगतवाडीकडे उतरतो. आम्हाला निम्म्यापेक्षा जास्त गड उतरून गेल्यानंतर आंबेवाडी आणि भगत वाडीच्या मधल्या रस्त्याला पोहोचायचे होते. कारण तिथे आमची परतीची सवारी हजर होती. गड उतरणे सगळ्यात त्रासदायक प्रकार. एकतर स्वत:च्या वाढलेल्या वजनाचा भार गुडघ्यांवर लादावा लागतो. त्यामुळे पायात गोळे येऊ लागतात. काही वेळानी तर उतरतेवेळी मांडीतले गोळे गुडघ्याच्या वाटीवर आदळू लागले की काय असा पायातून आवाज येत होता. पण कुलंग पायथ्याच्या सदाहारीत जंगलाच्या दर्शनानी हा सगळा त्रास विसरून गेलो. उतरतानाच कोतवाल पक्ष्याची जोडगोळी समोरून उडत समोरच्या जंगलात शिरली. यावरून आपण गावाजवळच्या वनराईत आलोत याची खात्री पडली. थोडी नजर उंचावताच शेताचे बांध दिसू लागलेआंबा, माहवा, कुसुम, शिरीष  अशा नाना तऱ्हेची झाडं जमीन धरून होती. शिवाय आमची तोंडं आंबट-तुरट करायला सोबतीला करवंदीची जाळी कच्ची करवंद घेऊन पाउलवाटेवर उभी होती. कालच पाउस पडून गेल्याने कस्तूर पक्षीही खुषीत असावा. दिसत नव्हता पण त्याचे अस्तित्व जाणवत होते. त्याची विशिष्ठ गायकी ढंगातली शीळ कानाला सुखावत होती. शेताच्या बांध्यापर्यंत पोहोचेस्तव आमची बस हजर झाली.ट्रेक संपला होता. पुढच्या तासाभरात आंबेवाडीत जेवून आम्ही पुण्याच्या दिसेल निघालेलो असुआमच्यातले अर्धे लोक वाट चुकून दोन किलोमीटर पुढे डांबरी रस्त्याला लागले होते. त्यांना चालत परतेपर्यंत तिथल्याच शेतात एका आंब्याखाली आडवे झालो. दुपारची वाऱ्याची झुळूक पिकांवरून फिरत पानांमधून सळसळत निघून गेली. सूर्य डोक्यावर तापत असला तरी वाऱ्याच्या स्पर्शामुळे त्याची दाहकता सुसह्य होती. दूरवर नजरेच्या स्तरावर क्षितिजाच्या अलीकडे अलंग मदन कुलंग निश्चल उभे होते. जणू काही आम्हालाच निरोप देण्यासाठी आमच्याकडे एकटक पहात होते. गावात डाळ भाताची मेजवानी झोडली. पुन्हा एकदा नवीन साथीदारांची ओळख परेड आणि संपर्काची देवाणघेवाण झाली. साहसी ट्रेक केल्यावर अस्सल ट्रेकरच्या चेहऱ्यावर उमटणारे पूर्णत्वाचे भाव बहुतेकांच्या चेहऱ्यावर दिसून आले. गावातून निघताना एकदा मागे वळून त्या कातळ कड्याचं रांगड रूप हृदयात साठवलं.सह्याद्रीच्या शिरपेचात अढळ स्थान मिळवलेले अलंग मदन कुलंग ह्या त्रिकुटाची प्रश्नार्थक नजर आमच्यावर खिळली होतीआता पुन्हा केव्हा येणार? या त्यांच्या प्रश्नाला आत्तातरी माझाकडे उत्तर नव्हते. पण आमच्या सारख्या भटक्यांची वाट बदलून सरळ मार्गी लावणारा, अवघड परिस्थिती विनासयास हाताळण्याचे बळ देणारा, निसर्गाच्या शिकवणीतून माणुसकी शिकवणारा आणि अपुर्णत्वाकडून पुर्णत्वाकडे नेणारा हा प्रवास आजन्म सुरु ठेवीन असे वचन देऊन आमची शरीरे घराकडे वळवली

विशेष आभार : हा ट्रेक Wild Trek Adveture, पुणे या संस्थेने आयोजित केला होता.