19 July 2015

गोरखगड-सिद्धगड

           
          गोरखगड आणि सिद्धगड.. बरेच दिवस मनात घोळत असलेला ट्रेक. बरेच दिवस अश्यासाठी की या गडांची चढाई ही सह्याद्रीचा पश्चिम घाटमाथा उतरून कोंकणातून सुरुवात करावी लागते. अगदीच तळ कोंकणातून नसले तरी कोंकणात जितकी दमट हवा तितकीच इथेही. मी स्वतः कोंकणातला असल्याने घाट माथ्याखालून चढाई म्हंटली की माझ्या कपाळी घाम येऊ लागतो. त्यामुळे 'बघू थंडीच्या मौसमात जाऊ' किंवा 'भर पावसात करू म्हणजे घाम कमी येईल' असल्या कारणांनी चालढकल करत हा ट्रेक राहून गेलेला. पण हल्ली थंडीही पूर्वीसारखी (गुलाबी?) पडत नाही आणि पाऊसही जेमतेमच बरसत असल्याने यावेळी जास्त आढेवेढे न घेता एका वीकेंडला गाठोडी उचलली आणि नेहमीप्रमाणे रात्री बाराच्या ठोक्याला घराबाहेर पडलो. सांगायला दिवस पावसाळी पण पुण्यात पावसाचा पत्ता नव्हता. मी, सुबोध, सुजय, अलोक आणि प्रणव असे गडी गोळा करत करत गाडी हायवेला लावली. आम्ही पाच आणि आमच्या पाच ब्यागा त्यामुळे वाढल्या वजनानी दबलेली माझी गाडी जरा कुंथतच चालत होती. त्यातच लोणावळा जवळ येताच माझ्या नाकाला बुर्जीच्या सुवासाची आठवण येऊन पोटातून अचानक 'एक हाफ फ्राय आणि डबल अंडा बुर्जी वीथ दोन पाव एक्स्ट्रा' अश्या आरोळ्या येऊ लागल्या. ह्या हाकेला ओ देत रात्री दोनच्या सुमारास सर्वप्रथम गाडीची भूक भागवून मग आमची गाडी खंडाळा एक्झिटच्या आधी एका टपरी बाहेर उभी केली. लोणावळ्यात मस्त पाउस होता. बुर्जी, म्यागी (सनफिस्टची, नेस्लेची नाही) आणि चहा अशी कडक मेजवानी झोडून पुन्हा गाडीनी हायवे धरला. पुढे जाऊन कर्जत-खोपोली रोडला उजवी घेतली तोपर्यंत पहाटेचे साडेतीन-चार वाजले होते. पावसाचे दिवस, त्यात महाराष्ट्र, त्यात रायगड जिल्ह्यातले गावाकडचे रस्ते त्यामुळे पूर्वीच्या अनुभवाने मुरबाड तालुक्यातले देहरी गाव गाठायला अजून तीन तास तरी नक्कीच लागतील या माझ्या अंदाजाला रायगड जिल्ह्याच्या पीडब्ल्यूडीनी काळे डांबर फासले. खोपोली-कर्जतहून नेरळ मार्गे देहरी गाठेपर्यंत रस्त्यात एकही खड्डा ‘न’ लागल्याने मी खडबडून जागा राहून गाडी चालवत होतो. हा चमत्कार कसा काय घडला असल्या विचारातून बाहेर पडेपर्यंत पुढच्या दीड-दोन तासात आम्ही गोरखगडाच्या पायथ्याला दाखल झालो. गावांना जोडणारा इतका सुंदर रस्ता मी फक्त गोव्यात फिरताना पहिला होता. वेळेआधीच पायथा गाठल्याने अजून उजाडायला बराच वेळ होता. त्यामुळे तिथेच रस्त्याशेजारील एका दुकानाबाहेर आम्ही आमच्या पथारी अंथरल्या आणि सकाळपर्यंत आडवे झालो. त्या दुकानाचा मालक हमीद पटेल याने शटर उचलल्यावर आम्हाला जाग आली. पटेलसाहेबांचे दुकान म्हणजे उत्तम युटीलिटी आहे. पेट्रोल पासून पोह्यांपर्यंत सर्व वस्तू दुकानात उपलब्ध आहेत. त्यातले फक्त आम्ही पोहे मागवून न्याहारी उरकली आणि गोरखगडाच्या वाटेला लागलो.        
Stripted Tiger
   देहरी गावातूनच गोरख आणि मच्छिंद्र गडाचे सुळके नजरेत भरतात. रस्त्यालगतच्याच विठ्ठल मंदिराशेजारून गडावर वाट जाते. वाटेवर पाऊल ठेवताच जंगलाचा फील येऊ लागतो. इथे तुमचे स्वागत करायला नाना रंगी फुलपाखरे येतात. लेमन पॅन्सी, ब्लु मोरोन, जेझेबेल, स्ट्रीप्टेड टायगर, कॉमन लेपर्ड अश्या निरनिराळ्या फुलपाखरांची फौज आपल्यासमोर फिरत असते. डोळ्यासमोर गोरखगडाचा सुळका ठेऊन चालू लागले की सुमारे
Common leopard
तासाभरात आपण सुळक्याच्या तळाशी असलेल्या महादेवाच्या भग्न मंदिरापर्यंत येउन पोहोचतो.  पुढे अजून पन्नास मीटर चढाई करून आम्ही कातळात खोदलेल्या दरवाज्यात येउन पोहोचलो. पाऊस मधूनच हुलकावणी देत होता. त्यामुळे कॅमेरा लपवण्यासाठी आमची धांदल होत होती.दरवाजाच्या आडोशालाच आमच्या ब्याग्स ठेऊन आम्ही गडाच्या पूर्वेला खोदलेल्या गुहेत येउन पोचलो. पंचवीस-तीस जण सहज मावतील एवढी मोठी गुहा गोरखगडाचे प्रमुख आकर्षण आहे. गुहेबाहेरच तीन पाण्याची टाकं आहेत. समोरच उभा असलेला मच्छिंद्रगडाचा सुळका स्वतःची ओळख करून देत होता. टाकातले पाणी भरून घेऊन आम्ही गडाच्या माथ्यावर चढाई करू लागलो. सुळक्यावर जाण्यासाठी डाव्या बाजूच्या कातळात अत्यंत सुरेख आणि तितक्याच अवघड अश्या सुमारे पन्नास पायऱ्या खोदलेल्या आहेत. प्रचंड वारा आणि अवघड काताळातील पायऱ्या यामुळे जरा कसरत करतच माथा गाठावा लागला.
        साधारण २१३० फुट उंची असलेल्या गोरखगडाच्या माथ्याचा विस्तार बराच मर्यादित आहे. इथले सुस्थितीतले छोटेखानी महादेव मंदिर पाहून जरा बरे वाटले. माथ्यावरून नजर उंचावल्यावर आहुपे घाटापासून ते नाणेघाटापर्यंतचा परिसर दिसत होता. पाठीमागे धमधामिचा डोंगर आणि सिद्धगड नजरेत मावत नव्हते. या परिसरात पाऊस झाल्याने चहुबाजूला हिरवा रंग ओसंडला होता. इतका रमणीय परिसर पाहून आपला थकवा नाहीसा होतो. मन शांत होते. गोरक्षनाथांनी साधनेसाठी याच डोंगराची निवड का केली असावी याचे उत्तर बालेकिल्यावर उभे राहिल्यावरच उमजते. आमच्यातल्या प्रत्येकाने गडाबरोबर, अहुपेघाटासोबत सेल्फी काढून घेतला नसता तरच नवल! महादेवाला दंडवत घालून आम्ही बालेकिल्ला उतरायला लागलो. आहुपे आणि गोरखगडाच्या बेचक्यातच गोरक्षनाथांचा रमणीय आश्रम आहे. इथूनच पुढे सिद्धगडाकडे नेणारा जुनी पायवाट तुडवून पुढील तीन चार तासात सिध्दगड गाठावा या हिशोबानी आम्ही आश्रमापर्यंत येउन पोहोचलो पण ‘पुढच्या दऱ्यांमध्ये दरड कोसळल्याने वाट सापडणार नाही’ अशी माहिती त्या आश्रमातल्या एका साधूने दिली. त्यामुळे नाईलाजास्तव ती दरड पाहून आम्ही पुन्हा पायथ्याकडे जाण्यासाठी निघालो.Ahupe Ghat
       सततच्या पावसाच्या हुलकावणीमुळे हवा दमट झाली होती. दुपारी दोनला देहरी गाठेपर्यंत घामानी भिजलो होतो. सुबोधला लिंबू सरबताची, प्रणवला माझाची तर सुजयला स्प्राईटची तहान लागली होती. हमीदभाईनी गरजेनुसार सगळ्यांचा तहान भागवल्या. दुपारचा डबा तिथेच खाऊन आम्ही सिद्धगडकडे रवाना होण्यासाठी सज्ज झालो पण हवेतील उष्म्यामुळे कोणाच्याही अंगात त्राण राहिले नव्हते. त्यातच नारिवली गावातून सिद्धगड माची गाठायला तीन चार तास लागतात असा अंदाज होता. पण वाटेत भेटलेल्या गावातील एका आजोबांनी नारिवली गावातून जाण्यापेक्षा जांभूर्डे गावातून गेलात तर सिद्धगड तासाभरात गाठाल असा सल्ला दिला आणि आम्हा सगळ्यांच्या जीवात जीव आला. त्यानुसार जांभूर्डे फाट्यावरून डावी घेतली आणि पुढे जाऊन 'भीमाशंकर संरक्षित वनक्षेत्र' या पाटीखाली फॉंरेस्ट चेकपोस्टला गाडीचे आणि माणसांचे शुल्क भरून अत्यंत कच्च्या रस्त्यांनी गाडी सिद्धगडाच्या दिशेला लावली. ट्रेकच्या कॉन्ट्रीमध्ये वाढ झालेली लक्षात येताच आम्ही त्या चेकपोस्टवाल्याला मनातच शिव्या वहिल्या. 
        इथून पुढे साधारण पाचसहा किलोमीटर कच्च्या रस्त्यानी गाडी हाकल्यावर स्वातंत्र्य सेनानी भाई कोतवाल यांचे समाधी स्थळ लागते. त्रेचाळीस साली या जागी ब्रिटिशांबरोबर झालेल्या चकमकीत भाई कोतवाल आणि हिरोजी पाटील हे दोन क्रांतिकारी मृत्युमुखी पडले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाधी स्थळ उभारण्यात आले. इथे पोहोचल्यानंतर मात्र आम्हा सर्वांची टाळकी सटकली. एका मोठ्या धबधब्या समोर ही समाधी एकाकी उभी होती. धबधबा असल्याने थोडीफार पर्यटकांची गर्दी असणारच. समाधीवर आणि समाधीजवळ दारूच्या बाटल्या, प्लास्टिक यांचा खच पडला होता. प्रणवनी पटकन जाऊन समाधीवर पर्यटकांनी काढलेले कपडे, बूट उचलून खाली ठेवले. झऱ्याखाली मोठ्या आवाजात, बेधुंद अवस्थेत काही तरुण कोतवालांच्या समाधीसमोर जणु काही त्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता म्हणून बीभत्स अवस्थेत नाचत होते. तिथल्याच फुटलेल्या बाटल्या घेऊन त्यांची डोकी फोडावीत असा विचार मनात येत होता. महाराजांच्या महाराष्ट्राला रक्तरंजित बलिदानाचा एवढा इतिहास असूनही इतकी कोडगी आणि बेफिकीर अवलाद आपल्याच देशी का जन्माला येतात? आपण कुठे आहोत याची यत्किंचितही जाणीव त्यांना नव्हती. फॉंरेस्ट चेकपोस्टवर अश्यांना बाटल्या घेऊन जातानासुद्धा कुणी आडवत नाही. कुणी आडवं आलाच तर तत्कालीन मंत्र्याची ओळख दाखवून दादागिरी दाखवायलाही लोक मागेपुढे पहात नाहीत आणि अश्यासारख्या इतर अनेक पर्यटनस्थळी दारूच्या दुकानांचे परमिट देणारेही सरकारी अधिकारीच. देवा धर्माच्या स्थळी पावित्र्य पाळता ना मग अश्या जागी सय्यम पाळायला बरी बुद्धी गहाण पडते. हेच पाहण्यासाठी का इथपर्यंत आलो? असे चेहरे आम्हा सगळ्यांचे झाले होते.काही क्षणातच आम्ही तिथून गाडी वळवली आणि दोन किलोमीटर अलिकडे असलेल्या जेमतेम पंधरा-वीस उंबऱ्याच्या बोरवाडी गावात पार्क केली. एका कमरेतून वाकलेल्या वाडीतल्या आजोबांनी सिद्धगडाकडे नेणारी पायवाट दाखवून दिली. दुपारचे चार वाजले होते. घनदाट वनक्षेत्राच्या परिसरात सिद्धगडाचा खडा पहाड आपले अस्तित्व दाखवत होता. गडाचा बालेकिल्ला ढगात गुडूप झाला होता. पाउस नव्हता तरी प्रचंड उष्मा अंग भाजून काढत होता.        
   पहिल्या टप्प्यातली खडी चढण चढताना हरीशचंद्राच्या नळीच्या वाटेची आठवण आली. निम्म्या वाटेवरती आमचा पहिला पडाव पडला. सगळे घामानी आणि चिखलानी माखले होते. उकाडा असह्य होत होता. एनर्जी ड्रिंक, गोळ्या, चिक्की यांची देवाणघेवाण सुरु झाली. अधेमधे थंड पाण्याचे झरे आमची तहान भागवत होते. पुढे अवघड असे नसले तरी निसरडे कातळ पार करताना बरीच काळजी घ्यावी लागत होती. गडाच्या माचीवर प्रवेश करण्याआधी शेवटच्या टप्प्यात छोटासा रॉकपॅच ओलांडताना सुजयच्या थकलेल्या पायांनी उगाचच हुलकावणी दिली आणि त्याचा चुकलेला काळजाचा ठोका पुढे उभे असलेल्या आम्हाला ऐकू आला. आता त्याचे पाय लटपटू लागले होते. अलोकनी त्याची ब्याग ओढून घेऊन मग त्याला वर ओढला. त्याचा चेहरा बघुन इकडे आम्हाला उगाच घाम फुटला होता. शेवटचा दगड ओलांडला आणि पुढे एका आंब्याखालून बालेकिल्ला उजवीकडे ठेऊन डावीकडची पायवाट धरली आणि इथपासून थेट सुमारे दोन किलोमीटरवर सिद्धगडवाडी गावाकडे पायपीट चालू केली. अंधार पडायला अजून तासभर अवकाश होता. पण गावाकडे आणि गावाकडून मंदिराकडे नेणारी वाट आंब्यांच्या गर्द झाडीतून पुढे सरकत होती. पायवाटेवर आंब्यांच्या ओल्या काळ्या पानांचा खच पडला होता त्यातच पाऊस झाल्याने चिखल साचला होता. रस्त्याच्या एका बाजूला शेतांमध्ये भात लावला होता. काही गावकरी शेवटची लावणी संपवून बैलजोडी घेऊन गावाकडे परतत होते. सिद्धगडवाडीच्या वेशीवर एका दगडी विहिरीवर आम्ही पाणी भरून घेतले.वस्तीसाठी बाले किल्ल्याच्या पोटातल्या बाबाच्या गुहेतच जाणार होतो पण अंधारू लागल्याने गावातील शाळेत डेरा टाकावा असा विचार करून गावाची वेस ओलांडली. जेमतेम वीस पंचवीस उंबरठे पण इथे शाळा आहे हे ऐकून कौतुक वाटले पण चौकशी केल्यावर ती बंदच असते असं कळले. 'एवढा पाऊस पाण्याचा डोंगुर चढून कुणी मास्तुर वर येत नाही' अशी माहिती मिळाली. एका पाडयावरील दोन गावकऱ्याजवळ शाळेची चौकशी केल्यावर त्यांनी 'गावाच्या खालच्या अंगाला अजून धा मिन्टावर मंदिरात जावा' अशी ऑर्डर सोडली. बहुदा पूर्वी कधीतरी आलेल्या टवाळ ट्रेकर्सनी शाळेत राहुन काहीतरी गोंधळ घालून त्रास दिलेला असावा असं त्यांच्या एकंदरीत आविर्भावावरून वाटत होते. 
      मंदिराकडे नेणारी वाट गर्द आमराईतून निघून सिद्धगडाच्या उत्तर दरवाज्याजवळ येऊन संपते. सूर्यास्त होऊन गेल्याने या वाटेवरती जास्तच अंधार दाटला होता. रस्त्याच्या टोकाला एके ठिकाणी पत्र्याची शेड नजरेस आली आणि तंगडतोड करून मोडकळीस आलेले पाय घेऊन मंदिराच्या ओटीवर पोहोचलो. ब्याग्स उतरवल्या आणि कपडे बदलून घेतले. स्टोव्ह मांडला आणि आधी चहाचं आधण ठेवलं. तोपर्यंत आम्ही सगळेजण स्थिरस्थावर झालो होतो. कुंद वातावरणात चहाचे झुरके घेत स्वागत करणाऱ्या निसर्गाशी ओळख करून घेत होतो. टिपीकल तळकोंकणातली जशी मंदिर असतात तशाच काहीश्या रचनेच सारवलेलं आयताकृती मंदिर पाहून सुखावलो. मंदिरातला देव मध्यभागी भल्यामोठ्या दगडाला शेंदूर फासून लाकडी महिरपीत बसवला होता. मंदिराच्या पायऱ्या जांभ्याच्या होत्या. चहुबाजूनी छानशी पडवी होती. मंदिराच्या मागे शंकराची भग्न पिंडी आणि नंदी होता. सातवाहन काळातील काही शिल्पकृती माळावर विखुरल्या होत्या. एक छोटीशी जम्बुरका तोफ दगडांवर बसवली होती.समोर अजस्त्र धमधमीचा पहाड ध्यानस्थ बसला होता. पाठीमागे गडाचा बालेकिल्ला धुक्यात गुडूप झाला होता. त्याच्या पायथ्याशी असलेल्या बेहड्याच्या जंगलात वानरांची हालचाल दिसत होती. भोवताली किर्र झाडी होती. रामरक्षास्तोत्र म्हणत असल्यासारखी संथ लयीतली रातकिड्यांची चाललेली किरकिर, मधुनच घंटानाद घुमावा तसे घुमणारे वानरांचे हुंकार यामुळे अत्यंत गूढ वातावरण तयार झाले होते. मधेच येणारी एखादी पावसाची सर सारी सृष्टी हालवून सोडत होती. सूर्य अस्तास गेल्याने पाखरांची परतीची लगबग कळत होती. सादेला प्रतिसाद देणारे नाना पक्ष्यांचे आवाज एकाचवेळी त्या परिसरामधून उमटत होते. पश्चिम घाटातला सगळ्यात आघाडीचा गायक म्हणजे 'मलबार व्हिसलिंग थ्रश' म्हणजेच कस्तूर. सूर्यास्तानंतर आपल्या विशिष्ट ढंगाच्या गायकीतून जणू काही 'यमन' साकारत असल्याचा भास होत होता. कुठलाही परतावा न मागता समर्पित भाव जागवणारा यमन जसे समोरच्याला आकर्षित करून घेतो तसाच स्वत्व विसरवून कितीतरी वेळ हा कस्तूर फक्त आमच्यासाठीच गात होता असं वाटत होतं. त्याच्या तोडीला दयाळ पक्ष्याची जोडी करवंदीच्या झुडुपावर बसून ताना देत होती. दोघांची घराणी सारखीच असली तरी गाण्याची ऐट निराळीच होती. एका झुडूपातली रातकिड्यांची किरकिर थांबली की लगेच दुसऱ्या झुडपातून रातकिड्यांचा आलाप सुरु व्हायचा. ही जुगलबंदी बराच काळ रंगली होती. संपूर्ण अंधारून आल्यावर सुरांचा दरबार बरखास्त झाला आणि आम्ही रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागलो. स्टोव्हवर आमचे आवडते ट्रेकान्न म्हणजेच खिचडी शिजत होती. आम्ही सारे स्टोव्ह भोवती कोंडाळ करून बसलो होतो. इतिहास, राजकारण, संगीत अश्या गप्पांना उधाण आले होते. प्रथेप्रमाणेच आमच्या डोक्यात भावी मोहिमांचे प्लानही शिजत होते. रात्रभर ड्रायव्हिंग आणि त्यात दिवसात दोन गड सर झाल्याने डोळ्यांवर झोप दाटली होती. भात शिजयचाच अवकाश की तो आम्ही मटकावून लगेच आडवे होणार होतो. पक्ष्यांची जुगलबंदी कमी होती म्हणून की काय सुजय आणि सुबोध यांनी रात्रभर एकमेकांशी घोरण्याची स्पर्धा लावली होती.          
 
Malbar Thrush (Courtsey:Google)
पहाटे पुन्हा एकदा कस्तुराच्या गाण्यांनी जाग आली. हा म्हणजे पूर्वी राजघराण्यांमध्ये पहाटेच्या समयी भाट आळवायचे तशी भूमिका इथे बजावत होता. सकाळी सहाच्या सुमारास समोरच्या दरीमध्ये नीळा प्रकाश फाकला होता. पाऊस पाण्याबरोबर वाळकी पाने मातीत मिसळून एक वेगळाच सुगंध सगळ्या जंगलात पसरला होता. माझी चाहूल लागताच मंदिरा मागच्या उंबरा वरून एक शेकरु टुणकन उडी मारून
Crested Serpent Eagle (Courtsey:Google)
झाडीत पसार झाले. सूर्य वरती सरकू लागला तसा समोरचा माळ प्रकाशात उजळून निघाला. एक 'क्रेस्टेड इगल' चीत्कार करत दरीवर घिरट्या घालत होते. तेवढ्यात आमच्या चाणाक्ष नजरेला माळावर झुडूपात काहीतरी हालचाल दिसली. झुपकेदार लांब शेपटीचे मार्जार कुळातील एक इंडिअन सीवेट वाळवी खाण्यासाठी धडपडत होते. थोड्या वेळानी आभाळात फिरणारे गरुडराज तिथे अवतरले. आपले दीड फुटी पंख पसरवून आणि पिवळ्या तीक्ष्ण चोचिनी हुलकावणी देऊन त्या रानमांजराला तिथून हुसकावू लावले. आमच्या कॅमेऱ्यांनी चाळीस पट नजर ताणून आम्हाला या प्रसंगाचे दर्शन घडवले. हा सगळा नजारा पाहण्यात आमची अख्खी सकाळ खर्ची पडली. इतकी सुंदर जागा सोडून कुठेही जाण्याची इच्छा झाली नाही. तसाही बालेकिल्ला अजूनही ढगांमाधेच डोकं घालून होता त्यामुळे वरती जाऊनही धुक्यात काही दिसणार नाही असे अनुमान काढून आता चहा मारून सरळ परतीच्या प्रवासाला निघायचे असे सर्वानुमते ठरले. आमचा गाषा गुंडाळून निघेपर्यंत साडेअकरा वाजले होते. हलक्या पावसाच्या सरी पायवाटा धुवून काढत होत्या. गर्द झाडीतून सड्यावर येईपर्यंत प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाचे दर्शन नव्हते. त्यामुळे एकदम काळोख्या गुहेतून बाहेर आल्यासारखे वाटत होते. तत्काळ ढगांचे पांघरूण उलथवून वाऱ्याचा एक स्त्रोत दरीत उडी घेऊन पुन्हा उसळी घेयचा. गड उतरायला लागल्यावर एक जाणीव प्रकर्षाने होऊ लागली. आम्ही जंगलातल्या त्या गूढ जगाचा निरोप घेऊन वास्तव जगाला सामोरे जाणार होतो. ना तिथे पाखरांची गीते ऐकू येणार होती ना कड्यावरून कोसळणाऱ्या झऱ्यांचा आवाज गुंजणार होता. जंगलाच्या उग्रगंधीत तरीही अद्वितीय सुवासाने संमोहित झालेल्या मनाला वास्तव जगताशी फारकत घेण्याचा मोह होत होता. पण व्यावहारिकदृष्ट्या या परावलंबी जगाला सोडून राहणे कोणालाच शक्य नव्हते. जगल्या क्षणांना आणि अनुभवलेल्या प्रसंगांना हृदयाशी घट्ट बांधुन आम्ही मनाची समजूत घातली आणि आल्या पाउलवाटी निघून इथल्या निसर्गाचा निरोप घेतला.

9 comments:

 1. Farach surekh... Khasach..!!! Tuzi post itki detailed aste ki wachakanna baslya jagi tya gadanchi safar ghadte.. Ani jodila khas Sameer shailitil vakya astat mag wachnaryalahi to anubhav aplach aslyasarkha watu lagto..
  Ata Gorakhgad ani sidhhgadawar jayche wedh amhalahi laglet...
  Khupach sundar lihilas.. Pudhil trek sathi shubhechha..!!
  ~Prakash Kale

  ReplyDelete
 2. मस्त रे ! याचीच वाट पहात होतो… अप्रतिम !

  ReplyDelete
 3. Apratim.. basalya jagi gadache darshan zale ase vatat asate.. photos mule maja yete vachayala ajun.. pudhil trek chya vruttantachi vat pahat ahe :)

  ReplyDelete